IMG-20260721-WA0024

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपअभियंता श्री. ढाकणे, शाखा अभियंता, संबंधित शासकीय कंत्राटदार तसेच पूजनीय भिक्खू संघ उपस्थित होते.

पाहणीदरम्यान स्मारकाच्या बांधकामात अनेक तांत्रिक त्रुटी व निकृष्ट दर्जाचे काम आढळल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांनी संबंधित कंत्राटदारास निकृष्ट दर्जाचे बांधकाम तात्काळ पाडण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण काम सात दिवसांच्या आत पाडून शासनाच्या निकषांनुसार उत्कृष्ट दर्जाचे नव्याने उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

निर्धारित मुदतीत आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित शासकीय कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची तसेच शासनाकडून अदा करण्यात आलेल्या रकमेची वसुली करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक अभियंत्यांनी दिल्याचे उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, आंबेडकरी संघटनांनीही संबंधित कंत्राटदाराने आदेशानुसार तातडीने निकृष्ट बांधकाम हटवून नव्याने दर्जेदार काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला.

यावेळी पूजनीय भंते संघप्रिय थेरो, भंते बोधी धम्मो, भंते आनंद, प्रांतोष भाऊ वाघमारे, दीपक निकाळजे, अमित वाहूळ, राहुल वडमारे यांच्यासह आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टीप : या वृत्तातील काही आरोप व मागण्या संबंधित संघटनांनी केलेल्या निवेदनावर आधारित आहेत. संबंधित कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *