पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन : आयएएस, आयपीएस बनून विद्यार्थ्यांनी देशसेवा करावी; शिवराणा सेवा संघाच्या वतीने १८५ गुणवंतांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी):
राजपूत समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आयएएस, आयपीएस, डॉक्टर, अभियंता आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून देशसेवा करावी. समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करता यावी, यासाठी सुसज्ज अभ्यासिका व वाचनालय उभारण्याकरिता ₹१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.
येथील पुंडलिकनगर परिसरातील तिरुमला मंगल कार्यालयात ‘शिवराणा सेवा संघ, महाराष्ट्र’च्या वतीने २५ व्या राज्यस्तरीय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
१८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात दहावी, बारावी तसेच आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी (MPSC) परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या १८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

वस्तुसंग्रहालय व अभ्यासिकेची मागणी
शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष एल. डी. ताटू यांनी प्रास्ताविकात संघाच्या २५ वर्षांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. तसेच राजपूत समाजातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका, वाचनालय आणि वीर महाराणा प्रताप वस्तुसंग्रहालय उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी १ कोटी रुपयांच्या निधीची तत्काळ घोषणा केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

शिव-राणांच्या विचारांचा आदर्श घ्यावा
कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्त्यांनी, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा व विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारावा, असे प्रतिपादन केले. या सोहळ्यात समाजभूषण पुरस्कारांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विनोद परदेशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अंजली कोकुळे यांनी मानले. या सोहळ्याला राजपूत समाजातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.