बिडकीन म्हरोळा, प्रतिनिधी :
रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चात होत असलेली वाढ आणि जमिनीची घटती सुपीकता लक्षात घेता नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी बिडकीन म्हरोळा येथे शेतकरी देशमुख यांच्या पुढाकाराने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशमुख यांनी नैसर्गिक खत तयार करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे साहित्य, वापरण्याची योग्य वेळ तसेच त्याचे शेतीतील फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नैसर्गिक खताची प्रत्यक्ष निर्मिती करून दाखवत शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर केले.
नैसर्गिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादन खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा कार्यशाळांचे अधिक आयोजन करण्याची मागणी उपस्थितांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी देशमुख यांचे अभिनंदन करत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.