विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरातील काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) देण्यासाठी आर्थिक मागण्या केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या प्रकरणाची निळा सलाम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष माहिती घेतली असता, अनेक पालकांनी टीसी देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत आणि आर्थिक अडचणी निर्माण केल्या जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले.सूत्रांच्या माहितीनुसार, काही शाळांकडून विविध शुल्कांचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना टीसी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नवीन शाळांमधील प्रवेश रखडत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. प्रवेश प्रक्रियेची मुदत संपण्याची भीती, शैक्षणिक नुकसान आणि मानसिक तणाव अशा समस्यांना पालक व विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.निळा सलाम प्रतिनिधींनी या संदर्भात माहिती घेतली असता, काही पालकांनी “आर्थिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असताना प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची आहे. मात्र, जर विद्यार्थ्यांना टीसी देण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असेल, तर ते गंभीर प्रकरण मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.प्रश्न अजूनही अनुत्तरित…विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करून टीसीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई कधी करणार?– निळा सलाम प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *