छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
नीला सलाम न्यूजने लिटल फ्लॉवर हायस्कूल, छावणी येथील विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक त्रास, टी.सी. न देणे, धमकावणे तसेच शाळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळेला अधिकृत पत्र काढून संपूर्ण प्रकरणाचा ७ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी लिटल फ्लॉवर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून, इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनीला टी.सी. न देणे, मानसिक व शारीरिक छळ, धमकावणे तसेच संबंधित सिस्टर व शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत प्राप्त तक्रारीवर स्पष्टीकरण मागविले आहे.
हे पत्र श्री. संतोष लक्ष्मण जाधव यांनी केलेल्या निवेदनाच्या आधारे काढण्यात आले असून, त्यातील सर्व मुद्द्यांवर शाळेने सविस्तर खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच समाधानकारक खुलासा न आल्यास नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने आपल्या पत्रात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार नाही, याची जबाबदारी शाळा प्रशासनाने घ्यावी, असेही स्पष्ट नमूद केले आहे.
या प्रकरणात नीला सलाम न्यूजने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने, पालक व नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आता शाळा प्रशासन काय खुलासा देते आणि शिक्षण विभाग पुढे कोणती कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य मुद्दे
नीला सलाम न्यूजच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली गंभीर दखल
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शाळेला अधिकृत पत्र
७ दिवसांत सविस्तर खुलासा सादर करण्याचे आदेश
समाधानकारक उत्तर न आल्यास पुढील कारवाईचा इशारा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश