छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
जागतिक स्तरावर ओळख असलेला आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक मानला जाणारा दौलताबाद (देवगिरी) किल्ला परिसर सध्या अवैध उत्खनन आणि अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) संरक्षणाखाली असलेल्या या ऐतिहासिक परिसरात नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून संबंधित यंत्रणा मात्र संशयास्पद शांतता बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे.मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, दौलताबाद घाट परिसरातील काही हॉटेल चालकांनी आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी ऐतिहासिक वारसालाच लक्ष्य केले आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार संरक्षित स्मारकाच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे उत्खनन, नवीन बांधकाम अथवा संरचनेत बदल करण्यास सक्त मनाई असताना देखील या नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.रात्रीच्या अंधारात सुरू उत्खननसूत्रांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण काम दिवसाऐवजी रात्रीच्या अंधारात केले जात आहे. जेणेकरून सामान्य नागरिक, पर्यटक किंवा संबंधित विभागांचे लक्ष त्याकडे जाणार नाही. परिसरात मोठे हॅलोजन दिवे लावून रात्री उशिरापर्यंत उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर, या भागातील एक जुनी ऐतिहासिक तटबंदी आणि संरक्षक भिंतीचा काही भाग तोडण्यात आल्याचा आरोप देखील केला जात आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या वास्तूंना व्यावसायिक फायद्यासाठी हानी पोहोचवली जात असल्याने इतिहासप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ऐतिहासिक वारशाला धोकादौलताबाद किल्ला हा केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक ठेवा आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. अशा परिस्थितीत किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेले अनधिकृत उत्खनन भविष्यात ऐतिहासिक संरचनांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करू शकते.तज्ज्ञांच्या मते, डोंगराच्या पायथ्याशी अथवा तटबंदीच्या जवळ करण्यात येणारे अनियंत्रित उत्खनन भूस्खलन, मातीची धूप तसेच ऐतिहासिक बांधकामांच्या पायाभूत रचनेवर विपरीत परिणाम करू शकते. त्यामुळे या प्रकाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे सर्व सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे? घाट रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, महसूल विभाग, ग्रामपंचायत, पर्यटन विभाग आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांची ये-जा होत असते. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले उत्खनन आणि बांधकाम संबंधित यंत्रणांच्या नजरेतून कसे सुटले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ हॉटेल चालकच नव्हे तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी होत आहे.पुरातत्व विभागाने घ्यावी तातडीने दखलइतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी भारतीय पुरातत्व विभाग (ASI), जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त चौकशी करून या प्रकरणाची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.जर संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन आणि बांधकाम झाल्याचे निष्पन्न झाले तर संबंधित हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त ऐतिहासिक भाग पूर्ववत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नागरिकांचा सवाल”ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, दौलताबादसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नियमांची खुलेआम पायमल्ली होत असेल तर भविष्यात आपल्या इतिहासाचे संरक्षण कोण करणार?” असा संतप्त सवाल आता नागरिक आणि इतिहासप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.दौलताबादच्या ऐतिहासिक वैभवावर घाला घालणाऱ्या या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.