20260721_162151

खोपेेश्वर | गंगापूर (विशेष प्रतिनिधी)

महावितरणच्या भ्रष्ट, कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?

महावितरणच्या लाजीरवाण्या आणि भोंगळ कारभारामुळे खोपेेश्वर शिवारातील ऊस जळीतग्रस्त शेतकरी आज अक्षरशः रस्त्यावर आला आहे. वर्षभर घााम गाळून पिकवलेला ऊस जळून खाक झाल्यानंतरही, महावितरणच्या भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीडित शेतकऱ्याला न्यायासाठी वणवण भटकावे लागत आहे. या संपूर्ण अनास्थेविरोधात आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईसाठी ‘निला सलाम’ चे कार्यकारी संपादक यांनी महावितरण प्रशासनाविरोधात हा गंभीर विषय अत्यंत प्रखरपणे मांडला असून, शेतकऱ्याच्या न्यायाची ठाम मागणी केली आहे.

१. कनिष्ठ अभियंता श्री. लंगोटे (काटेपिंपळगाव) यांची दिरंगाई व अकार्यक्षमता

मिळालेल्या माहितीनुसार, काटेपिंपळगाव येथील कनिष्ठ अभियंता श्री. लंगोटे यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी या ऊस जळीत प्रकरणाचे पंचनामे व कागदपत्रे पूर्ण केली होती. परंतु, आज तब्बल आठ महिने उलटून गेले तरीही हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला नाही. आठ महिने फाइल दाबून ठेवण्यामागे लंगोटे यांचा कोणता हेतू आहे? असा संशयास्पद प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार आणि अप्रामाणिक वर्तनामुळे पीडित शेतकऱ्याचे आतोनात आर्थिक व मानसिक हाल होत आहेत.

२. गंगापूर विभागाचे श्री. काळे यांचे गैरवर्तन व शासकीय निधी लाटण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, गंगापूर विभागातील अधिकारी श्री. काळे यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. न्यायाची मागणी करण्यासाठी गेलेल्या पीडित शेतकऱ्याशी काळे यांनी अत्यंत उद्धट, अयोग्य आणि अपमानास्पद वर्तन केले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणात कागदपत्रांमध्ये परस्पर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव जोडून शासकीय निधी लाटण्याचा व उघड-उघड फसवणूक करण्याचा गंभीर प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय पदाचा वापर करून असा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

३. उपअभियंता (ग्रामीण) श्री. सपकाळ यांच्याकडून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार

या संपूर्ण भ्रष्ट कारभाराची तक्रार आणि पुरावे घेऊन जेव्हा उपअभियंता (ग्रामीण) श्री. सपकाळ साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले, तेव्हा त्यांनी ठोस कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, सपकाळ यांनी स्वतः निवेदन स्वीकारूनही दोषी अधिकारी श्री. काळे आणि श्री. लंगोटे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी, हे संपूर्ण प्रकरण दाबून टाकत दोषी अधिकाऱ्यांना उघड-उघड पाठीशी घालण्याचा प्रयत्न सपकाळ यांच्याकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप ‘निला सलाम’च्या संपादकीय टीमकडून करण्यात आला आहे.

४. अधीक्षक अभियंत्यांकडे अर्ज; प्रशासनाकडून प्रकरणाची गंभीर दखल

या भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसावा आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळावा, यासाठी ‘निला सलाम’ च्या कार्यकारी संपादकांनी थेट महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे (Superintending Engineer) लेखी अर्ज सादर केला आहे. अधीक्षक अभियंत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, अर्जातील मुद्द्यांच्या आधारे चौकशीचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे आता या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्याचा सवाल: भ्रष्टाचाऱ्यांचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार?

महावितरणच्या या त्रिकुटाने (लंगोटे, काळे आणि सपकाळ) शेतकऱ्याला न्यायापासून वंचित ठेवण्याचेच काम केले आहे. एका बाजूला अस्मानी संकटाने पिचलेला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला महावितरणच्या सुलतानी कारभाराचा फटका!

अंतिम मागणी व भूमिका:

पीडित शेतकऱ्याला ऊस जळीताची योग्य भरपाई तातडीने देण्यात यावी. तसेच कर्तव्यचुकार कनिष्ठ अभियंता श्री. लंगोटे, फसवणुकीचा प्रयत्न करणारे श्री. काळे आणि त्यांना पाठीशी घालणारे उपअभियंता श्री. सपकाळ यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कडक प्रशासकीय व कायदेशीर पावले उचलावीत, अशी रोखठोक आणि प्रखर मागणी ‘निला सलाम’ कडून प्रशासनाकडे लावून धरण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *