छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (बामू) ‘बॉटनी कँटीन’ बिना परवान्या सुरू
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (बामू) ‘बॉटनी कँटीन’ बिना परवान्या सुरू असून, तिथे मूलभूत सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या गंभीर बाबींची दखल घेत ‘नीला सलाम’ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रमोदकुमार प्रधान यांनी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) उप-आयुक्त श्री. श्रीकांत करकाळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परवान्यांचा अभाव आणि अस्वच्छतेचे साम्राज्य
‘नीला सलाम’च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात कँटीनच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवण्यात आले असून, त्यात प्रामुख्याने परवान्यांचा अभाव, अस्वच्छतेमुळे निर्माण झालेला आरोग्याचा धोका आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता याविषयी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कँटीनमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे कोणताही गणवेश नाही, तसेच त्यांची वैयक्तिक स्वच्छताही राखली जात नसल्याचे समोर आले आहे.
टेंडर प्रक्रियेत संगनमताचा गंभीर आरोप
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, विद्यापीठातील काही अधिकारी आणि कँटीन चालक यांच्यात संगनमत झाले आहे. कायदेशीर टेंडर प्रक्रिया न राबवता मर्जीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला हे कँटीन चालवायला देण्यात आले आहे. दुसरीकडे, सुशिक्षित बेरोजगार संस्था आणि महिला बचत गटांनी अनेक महिन्यांपूर्वी टेंडर भरूनही त्यांची अनामत रक्कम अडकून पडली असून त्यांच्यावर अन्याय होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाला साकडे
कार्यकारी संपादक प्रमोदकुमार प्रधान यांनी उप-आयुक्त श्री. श्रीकांत करकाळे यांना भेटून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींचा पाढा वाचला. केवळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नच नाही, तर विद्यापीठातील अनागोंदी कारभाराकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि हक्काशी संबंधित या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास, येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘नीला सलाम’च्या वतीने देण्यात आला आहे. या तक्रारीमुळे विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.