म्हारोळा गावामध्ये बियाणे वाटप उत्साहात.

निला सलाम | प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील म्हारोळा या छोट्याशा गावामध्ये कृषी क्षेत्रातील प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. येथील ‘श्रीराम प्रभू जानकी शेतकरी गट, म्हारोळा’ या गटाच्या वतीने ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्यात आला होता. या प्रक्रियेअंतर्गत गटातील सर्व शेतकरी बांधवांना कपाशी, तूर आणि बाजरी या बियाणांचा थेट लाभ मिळाला आहे.

विशेष म्हणजे, ऐन पेरणीच्या आणि योग्य वेळेत हे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप संपन्न

या बियाणे वाटप कार्यक्रमासाठी ‘आत्मा’ (ATMA) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आशा बर्गे मॅडम यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व शेतकऱ्यांना बियाणे सुपूर्द केले. या संपूर्ण प्रक्रियेत आणि गटाच्या वाटचालीत तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील साहेब, मंडळाचे चव्हाण साहेब आणि कृषी सहाय्यक जे. एस. पिंपरीये मॅडम यांचे मोलाचे व वेळोवेळी सहकार्य लाभले आहे.

पाणी फाउंडेशन ‘फार्मर कप २०२६’ मध्ये सहभाग

गावातील कृषी सहाय्यक जे. एस. पिंपरीये मॅडम यांच्याकडे सध्या ‘फार्मर कप २०२६’ ची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे गावातील अतिरिक्त कार्यभार सध्या अपूर्वा मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

गट शेतीची नवी झेप:

पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ स्पर्धेत ‘श्रीराम प्रभू जानकी शेतकरी गट’ संपूर्ण ताकदीनिशी गट शेतीमध्ये उतरला आहे. या वर्षीच्या स्पर्धेसाठी गटाने मका या पिकाची निवड केली असून, लाभलेले मेंटर्स (मार्गदर्शक) वेळोवेळी दिलेल्या मोलाच्या सल्ल्यांमुळे हा गट सातत्याने पुढे जात आहे.

‘द्वारकामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी’ची उभारणी

शेतकरी गटाच्या पुढे जाऊन आता म्हारोळा गावामध्ये ‘द्वारकामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ ची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. कृषी अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे कष्ट याच्या जोरावर हा गट आणि नव्याने स्थापन झालेली कंपनी प्रगतीपथावर आहे.

कृषी विभागाने म्हारोळा गावावर, तालुक्यावर आणि या शेतकरी गटावर आपले सहकार्य व वरदहस्त असाच सदैव ठेवावा, अशी सदिच्छा या प्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी व गट सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *