20260624_172754

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:

भावसिंगपुरा येथील साठे चौक, भीमनगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाबाबत आज निळा सलाम न्यूज पेपरचे कार्यकारी संपादक प्रमोदकुमार प्रधान यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
साठे चौक परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन उखडण्यात आल्याने हजारो नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात निळा सलाम न्यूज पेपरने यापूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन कार्यकारी संपादक प्रमोदकुमार प्रधान यांनी आज कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
निवेदनात पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून कांता हॉटेल परिसरातून येणाऱ्या पाणीपुरवठा लाईनला जोडणी देऊन साठे चौक परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.
साठे चौक, भीमनगर परिसरातील नागरिकांनी निळा सलाम न्यूज पेपरने त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी निळा सलाम न्यूज पेपर पुढेही पाठपुरावा करणार असल्याचे कार्यकारी संपादक प्रमोदकुमार प्रधान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *