छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :
भीमनगर-भावसिंगपुरा साठे चौक परिसरातील पुलाच्या कामादरम्यान ठेकेदाराने पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन उखडून टाकल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचाही दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात आठ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाईपलाईन उखडल्यापासून अनेक दिवस उलटून गेले तरी पाण्याचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे पुलाचे कामही बंद अवस्थेत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना वारंवार भटकंती करावी लागत असून मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी मनपा प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत सांगितले की, पर्यायी पाईपलाईन किंवा दुसऱ्या लाईनमधून पाणीपुरवठा केल्यास हा प्रश्न तात्पुरता सोडवता येऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
साठे चौक परिसरातील नागरिकांचा सवाल आहे की, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार? संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न नेमका कधी सुटणार?
पाण्यासाठी हैराण झालेल्या नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पर्यायी व्यवस्था करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सध्या मात्र साठे चौक परिसरातील हजारो नागरिक पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.