MSCDCL 4

निला सलाम | गंगापूर

महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत नुकसान होऊनही, तब्बल सात महिने उलटून गेले तरी एका गरीब शेतकऱ्याला अद्याप हक्काची नुकसान भरपाई मिळालेली नाही. वरून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला उडवाउडवीची आणि असभ्य भाषेमध्ये उत्तरे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यात समोर आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

गंगापूर तालुक्यातील मेंढी भालगाव शिवारातील खोपेश्वर

 गट नंबर २० मधील शेतकरी बाबासाहेब बाजीराव कोऱ्हाळे यांच्या शेतातून महावितरणची वीज वाहिनी जाते. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक शॉर्टसर्किट होऊन विजेच्या खांबाची तार तुटली आणि कोऱ्हाळे यांच्या उसाच्या पिकाला भीषण आग लागली. या आगीत त्यांचा दोन एकर ऊस जळून खाक होणार होता, मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एक एकर ऊस वाचवण्यात यश आले, तर एक एकर ऊस पूर्णपणे जळाला.

पंचनामा होऊनही फाईल धूळ खात!

या घटनेनंतर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी काटेपिंपळगावचे कनिष्ठ अभियंता श्री. भाऊसाहेब लंगोटे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पॉईंट पंचनामा केला. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांनीही रीतसर पंचनामा करून त्याची प्रत शेतकऱ्याला दिली. हा अहवाल तालुक्याकडून जिल्ह्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. परंतु, आज सात महिने उलटून गेले तरीही पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाईची दमडीही मिळालेली नाही.

अधिकाऱ्यांची मनमानी आणि संशयास्पद कारभार

हताश झालेल्या शेतकरी बाबासाहेब कोऱ्हाळे यांनी न्याय मिळवण्यासाठी *’निला सलाम न्यूज पेपर’* च्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. न्यूज पेपरच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यासह महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, धक्कादायक बाब समोर आली. सदर केसचा रेकॉर्ड हा ‘Record Return Document’ म्हणून पुन्हा गंगापूर तालुक्याकडे पाठवण्यात आल्याचे समजले.

याबाबत गंगापूर कार्यालयातील श्री. काळे (संबंधित अधिकारी) यांची भेट घेतली असता, त्यांनी “उद्या फोन करा” असे सांगून शेतकऱ्याला पाठवले. दुसऱ्या दिवशी अनेक फोन केल्यानंतर त्यांनी एक फोन उचलला आणि अत्यंत उद्धटपणे, “मी माझ्या पद्धतीने काम करतो, वरिष्ठांकडे काय तक्रार करायची ती करा” अशा भाषेत उत्तर दिले.

निधी हडप करण्याचा डाव? शेतकऱ्याचा गंभीर आरोप

पीडित शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब बाजीराव कोऱ्हाळे असे असताना, कार्यालयातील कागदपत्रांवर त्यांच्या नावासमोर ‘कोऱ्हाळे’ ऐवजी ‘काळे’ असे लिहिण्यात आले आहे. पंचनाम्यात एकाच व्यक्तीचे नाव असताना, तालुक्याला पाठवलेल्या नुकसान भरपाईच्या रिपोर्टमध्ये मात्र दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नावे दाखवण्यात आली आहेत.

“माझ्या नावात जाणीवपूर्वक बदल करून आणि दोन व्यक्तींची नावे दाखवून महावितरणचे काळे साहेब परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर निधी हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी शंका येते. मी याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला असभ्य भाषेत उत्तरे दिली,” असा गंभीर आरोप शेतकरी बाबासाहेब कोऱ्हाळे यांनी केला आहे.

तातडीने कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर आणि अधिकारी श्री. काळे यांच्या प्रामाणिकपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला हक्काचे पीक जळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी बाबूंच्या आडमुठ्या धोरणामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि शेतकरी बाबासाहेब कोऱ्हाळे यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *