IMG-20260721-WA0022

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील नामांतर शहीद स्मारकाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना आणि आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने देण्यात आला.

या मागणीसंदर्भात रविवारी (दि. 20 जुलै 2026) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, नामांतर आंदोलनातील शहीद आणि 17 वर्षे चाललेल्या नामांतर लढ्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाने करण्यात आले आहे.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाबाबत अनेक वेळा निवेदने व आंदोलने करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी राहुल वडमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आमरण उपोषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यामध्ये स्मारकाच्या बांधकामातील त्रुटी आढळल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

निवेदनानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 29 जून 2026 रोजी संबंधित ठेकेदारास निकृष्ट बांधकाम पाडून नव्याने दर्जेदार काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संपूर्ण बांधकाम पाडण्याऐवजी केवळ काही भाग हटवून उर्वरित काम योग्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

याशिवाय, या प्रकरणातील कथित गैरप्रकार उघडकीस आणणारे राहुल वडमारे यांना संबंधित ठेकेदाराच्या पतीसह अन्य एका व्यक्तीकडून पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंबेडकरी संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे संपूर्ण बांधकाम पाडण्यात यावे, दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि शहीद स्मारकाचे नव्याने दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा विद्यापीठासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी दीपक निकाळजे, अरविंद कांबळे, अमित वाहूळ, प्रांतोष वाघमारे, सचिन निकम, राहुल वडमारे, राकेश कांबळे, नागेश केदारे, पवन पवार, मिलिंद दाभाडे, सचिन जोगदंड, सोनू नरवडे, कपिल बनकर, नंदू साळवे, जयश्री शिरके, सॅडी गुरु, संगीता जाधव, सतीश सुरडकर, प्रताप मोरे, रतन जाधव, अमोल गडवे, बंडू तांदळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.

टीप : या वृत्तातील आरोप संबंधित संघटनांनी निवेदनाद्वारे केले असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *