'वस्त्र संहिता–2026' फॅशन डिझाईन स्पर्धेत मिटमिटाच्या सानिका डिझाईन कॉलेजचा डंका

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या एकलव्य फॅशन डिझाईन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वस्त्र संहिता–2026’ या राज्यस्तरीय फॅशन डिझाईन स्पर्धेत मिटमिटा येथील सानिका डिझाईन कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध फॅशन डिझाईन महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या दिमाखदार कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

स्पर्धेसाठी सानिका डिझाईन कॉलेजच्या विद्यार्थिनींनी ‘नवरस – वस्त्र संहिता 2026’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे सादर केली. नऊ रस आणि विविध देवीस्वरूपांची कल्पक मांडणी आधुनिक फॅशन डिझाईनशी सुंदरपणे जोडत विद्यार्थिनींनी आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार घडविला. त्यांच्या या कलात्मकतेला आणि सादरीकरणाला परीक्षकांची विशेष दाद मिळाली.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक प्रा. सुनील मगरे व प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. तसेच या यशामागे महत्त्वाचे मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिकांसोबतच संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *